मंगळवार, ७ मार्च, २०१७

स्त्री: काल आणि आज (जागतिक महिला दिनानिमित्त लेख)

*स्त्री: काल आणि आज*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
        जागतिक महिला दिनाच्या औचित्याने "स्त्री..काल आणि आज" या विषयाचा ऊहापोह करत असताना मनुपूर्व काळातील स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि स्थानाबद्दल काही ठळक बाबी अधोरेखित कराव्याशा वाटतात.पाणिनीच्या अष्टाध्यायाचा संदर्भ लक्षात घेका नमूद करावेसे वाटते की ज्या आज स्त्रिया स्वत:चं वलय,क्षितिज निर्माण करून स्वातंत्र्य उपभोगत आहेत अगदी त्याच पद्धतीने मनुपूर्व काळामध्ये स्त्रियांना मुलभुत अधिकार प्रदान करण्यात आले होते.स्त्रिया गुरूकुलांमध्ये वेदशास्त्राच्या विविध शाखांचे अध्ययन करत होत्या.पतंजलीच्या महाभाष्यावरून दिसून येते की स्त्रिया गुरूकुलांमध्ये शिक्षिका होत्या.अथर्ववेदाप्रमाणे स्त्रियांना उपनयनाचा देखील अधिकार होता.तसेच सामाजिक,धार्मिक,तात्विक विषयांवरती आयोजित केल्या जाणार्या चर्चांमध्ये स्त्रिया आपली मते विचार परखडपणे मांडत होत्या.
         सार्वजनिक वादविवादात जनकाबरोबर सुलभाने,याद्न्यवल्क्याबरोबर गार्गीने,शंकराचार्याबरोबर विद्याधरेने दोन हात केल्याच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते की स्त्रिया द्न्यान व शिक्षणाच्या अत्युच्च पदावरती पोहचलेल्या होत्या.तत्कालिन समाजात त्यांना मान होता.
      बौद्धकाळामध्ये देखील स्त्रियांच्या स्वातंत्र्याला अधिक महत्व दिले गेल्याचे अभ्यासातून स्पष्ट होते.बौद्ध साहित्यातील बरेचसे दाखले देता येतील किंबहूना सर्वांची खात्री पटेल की बुद्धाने स्त्रीवर्गासंबंधीचे केलेले आदरयुक्त उल्लेख स्त्रियांना उदात्तता प्राप्त होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न ,तसेच तिला उच्च दर्जा प्राप्त होण्याच्या दृष्टीने अवलंबिलेले मार्ग स्त्रियांच्या उन्नतीस पोषक होते.तथागत बुद्धाने स्त्रियांना संन्यास किंवा परिव्रज्या (भिक्खुणी)घेण्यास परवानगी देण्याचे क्रांतिकारक कार्य केले होते.स्त्रियांना परिव्राजिकेच्या जीवनात प्रवेश करण्याची मुभा देऊन बुद्धाने एकाच प्रहारात स्त्रियांवरील अन्याचाचा नायनाट केला.स्त्रियांना द्न्यानार्जनाचा हक्क देऊन पुरुषांच्या बरोबरीने आध्यात्मिक शक्तीची अनुभूती घेण्याचा हक्क बहाल केला.ही भारतीय स्त्रियांच्या इतिहासातील फार मोठी क्रांती आणि मुक्तीही होती.
         एकीकडे मनुपूर्व काळात,बौद्धकाळात स्त्रियांना मोकळा श्वास घेण्याची मुभा होती.मात्र मनुस्मृतीच्या कायद्यांची चौकट आखून मनुने स्त्रियांना गुलामीच्या साखळदंडात बांधून ठेवले.
*न स्त्री स्वातंत्र्यम अर्हमति*
असे म्हणत स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांची आणि अस्तित्वाची क्रुर हत्याच केली.भारतीय समाजावरती मनुस्मृतीच्या कायद्याचा फार मोठा पगडा असलेला दिसून येतो.*चूल आणि मूल'*एवढंच विश्व असणार्या स्त्रिची फार मोठी पिछेहाट झाली.शिक्षण,अभिव्यक्ती,आर्थिक,सामाजिक, अशा सर्व क्षेत्रातून स्त्रियांचे स्थान शुन्य झाले होते.विविध देवीदेवतांच्या माध्यमातून स्त्रियांना पूजणारा भारतीय समाज मनुस्मृतीचे जोखड मानेवरती घेऊन जगू लागला होता.एकंदरीत स्त्रियांची स्थिती फारच बिकट आणि दयनीय झाली होती.
        स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रियांच्या स्थितीमध्ये पुन्हा नवी क्रांती घडवून आणली ती महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,महर्षी कर्वे,राजाराम मोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी.आज स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवताना दिसत आहे.पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक,साहित्य,राजकीय,कला,क्रीडा आणि विद्न्यान अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी केलेली कामगिरी थक्क करणारी लक्षवेधी अशी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून भारतीय संविधानाद्वारे शुद्रांबरोबरच स्त्रियांच्या सर्वांगीण स्वातंत्र्याचा मार्गच मोकळा आणि कायदेशीर करून टाकला.पिढ्यान पिढ्यांच्या साखळदंडातून स्त्री मुक्त आणि सशक्त झाली.
        आज स्त्रियांना मान, सन्मान,स्वतंत्र दर्जा मिळाल्याचे पहायला मिळते.स्त्रियांच्या मतांची कदर बर्याच प्रमाणात केली जाते.मात्र सद्यस्थितीतील विसंगतीकडेही कानाडोळादेखील करून जमणार नाही.कारण विविध रुपातून स्त्रियांना पूजले जाते.*ज्ञान,समृद्धी ,स्थैर्य व विरतेची ही पूजा असते तसेच स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज जनलोकात रुढ असलेला पहायला मिळतो.*परंतू प्रचलित रुढी,परंपरा आणि प्रत्यक्षात आपले असलेले वर्तन व द्रृष्टिकोन यांमध्ये कमालीची विसंगती आढळून येते.
*एकीकडे लक्ष्मी म्हणून स्त्रीजातीची पूजा करायची आणि दुसरीकडे मात्र घरात,समाजात तिला दुय्यम दर्जाची वागणूक देऊन तिची अवहेलना करणे,तिच्या स्वातंत्र्य व कर्तुत्वाची गळचेपी करणे राजरोसपणे चालु आहे.*
       २१व्या शतकात पाऊल ठेऊन एक जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने चाललेली भारताची वाटचाल पाहून अभिमान वाटतो.मात्र ही वाटचाल करत असताना आपल्या मनात कुठेतरी खोलवर *मनुवादाची* बुरसटलेली विचारसरणी घट्टपणे अधिष्ठान घालून बसलेली दिसते.कारण स्त्रियांचे मुलभूत प्रश्न अजूनही आम्ही सोडवू शकलेलो नाही.याला आपली  स्त्रियांच्या बाबतीत असलेली संकुचित वृत्ती,अनास्था आणि उदासिनता कारणीभूत असलेली दिसून येते. स्त्री-पुरुष या दोहोंत भेदभाव करणे आणि या लिंगभेदाच्या मनोवृत्ती आणि विकृतींमधूनच स्त्रियांचे असंख्य प्रश्न पुन्हा नव्याने बळ धरु पाहत आहेत.
       स्त्रीभ्रृणहत्येचा प्रश्न तर सद्यस्थितीत खूपच गंभीर स्वरुपाचा झालेला दिसून येतो.
*इथे स्त्रीचा जन्म घेण्याचाच हक्कच नाकारला जातो तिथे तिच्या अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याबद्दल काय बोलावे.*
जागतिक महिला दिनाच्या सप्ताहात सांगली जिल्ह्यातील म्हैसाळा येथील अगदी ताजी घटना भ्रुणहत्येच्या धगधगत्या वास्तवासमोर नि:शब्द आणि लज्जित करून जाते.
सध्या भारतातील स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तर प्रमाण पाहिल्यास हे प्रमाण चिंतेचे आणि चिंतनाचे वाटते.आज भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही हा लिंगगुणोत्तराचा प्रश्न ज्वलंत आणि गंभीर स्वरुपाचा बनलेला आहे.आशिया ,आफ्रिका खंडातील तुलनात्मक रितीने मृत्युचे प्रमाण जर पाहिले तर स्त्रीमृत्युचे प्रमाण बर्याच अंशी जास्त असलेले दिसुन येते.यामागे प्रामुख्याने कुटुंबातील स्त्रीचे हीन स्थान,कुपोषण,घरगुती हिंसा,वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव,जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि समाजाची मानसिकता इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत असतात.
*ज्या देशात माता सावित्रीबाई स्त्रीशिक्षणासाठी मनुवादी विचारांना आव्हान निर्माण करून उभ्या राहिल्या त्या देशात मुलींची शिक्षणाची समस्या अजूनही पुर्णपणे सुटलेली नाही.*स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे मात्र हे प्रमाण अजून बर्याच प्रमाणात वाढणे गरजेचे आहे.कौटुंबिक व आर्थिक अडचणी ,असुरक्षितता,दारिद्र्य ,भावंडांचे पालनपोषण आणि  मानसिकता इ.कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत.तसेच मालकी हक्काबाबत असमानता,व्यावसायिक,शैक्षणिक ,कौटुंबिक स्तरावरील लिंगभेद तसेच समाजात राजकारणात दुय्यम दर्जाची वागणूक देणे तसेच संकुचित दृष्टीतून स्त्रीकडे पाहणे यासर्व अपप्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजेत.
         आज वर्तमानपत्रे,दुरदर्शन आणि इतर अनेक प्रकारच्या प्रसारमाध्यमातून स्रियांवर होणारे बलात्कार,अत्याचार आणि शोषणाचे अध्याय वाचल्यानंतर प्रश्न पडतो की हेच लक्ष्मीपूजन का?हीच बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांची क्रांतिकारी भूमी आहे का?माता जिजाऊ,माता सावित्रामाई,माता रमाई यांची भूमी हीच का?ज्याच्या राज्यात कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती अशा माझ्या शिवरायांच्या राज्यात आज ७महिन्याच्या बालिकेपासून ७०वर्षांच्या स्त्रीला सुद्धा सुरक्षित वाटत नाही.
         या महामानवांचे विचार आत्मसात करुन आचरणाने आपण आता बदललं पाहिजे.प्रचलित असणार्या रुढी,परंपरांना आधुनिकता व पुरोगामित्वाची वैचारिक बैठक देऊन स्त्रियांना आज मनापासून पुजले पाहिजे.
       *तथागत गौतम बुद्ध म्हणतात की,"ज्यांच्या दृष्टीने मुलीचा जन्म ही दु:खद घटना नसून तो आनंदाचा प्रसंग आहे.तसेच जी कुटुंबे स्त्रियांवर अवलंबून राहतात अशा कुटुंबांचा नाश होन्यापासून बचाव होतो.*
         त्यामुळे आपल्या घरातील तसेच समाजातील स्त्रियांना समान वागणूक देऊन त्यांच्या अभिव्यक्ती,स्वातंत्र्य,अधिकार आणि मतांची कदर केली पाहिजे.त्यांचा मान आणि सन्मान केला पाहिजे.
        स्त्रीभ्रुण हत्या व होणारे अत्याचार यांना थांबवून तिच्या आरोग्य,शिक्षण आणि समानसंधीची गांभिर्याने दखल आणि काळजी घेतली पाहिजे.समाजात तिला मानाचे स्थान द्या.आवश्यकता भासेल तेथे समर्थ साथ द्या.तिला तिच्या शैलीत स्वतंत्रपणे सन्मानाने मनसोक्त जगू द्या.कारण स्त्रियांची प्रगती ही कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी पोषक आणि अनुकुल असते.
         पुरुषप्रधान संस्कृतीचा त्याग करून पुरोगामी विचारांना कवटाळत स्त्रियांना मनोभावे पूजुया.कारण स्त्रियांना समानतेची वागणूक, तिच्या मतांची कदर आणि तिच्या विचारांचा आदर सन्मान हीच खरी आधुनिक लक्ष्मीपूजा आणि हाच खरा महिला दिन.शेवटी उत्सव हे बेगडी न राहता विचार आणि आचारांचे साजरे झाले पाहिजेत.
       धन्यवाद.
:::::::::::::::::
 *लेखन-किरण अहिवळे*
 मो.नं.७३०४७५६३६८
                  ::::::::::::: :::::::::::

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा