प्रिय बाबा.........
आज तुमची खूप आठवण येतेय...
खरंच.
एरवी..काहींना
आरक्षणाचा लाभ घेताना
शाळा कॉलेजातून
जातीचा चिटोरा पुढं करून
शिष्यवृत्ती लाटताना
किंचितसे आठवता तुम्ही
परंतू खरंच..
तूम्ही होतात म्हणून
आम्ही आज
स्वाभिमानाने जगतोय
या चार भिंतींच्या पलिकडचं
हे विशाल जग बघतोय
सारलात तूम्ही
प्रद्नेच्या तेजाने
पिढ्यानपिढ्यांचा अंधकार
जाळलात तूम्ही
मनूच्या कपटाचा
जुलमाचा..अन्यायाचा अहंकार
बाबा...
आमच्या स्पर्शाने
बाटणारे फळे
आज आमच्याशी बोलू लागलेत
कधीकाळी आमच्या
सावलीनेही विटाळणारे
आमच्याशी नाती जोडू लागलेत
आम्ही मात्र..
नातं तोडलं कधीच
विषमतेच्या,गुलामगिरीच्या जोखडांचे
आता नवे आयाम दिलेत आम्ही
समाजाला
प्रद्न्या,शील,करुणेच्या मापदंडांचे
बाबा...
तुम्ही
किती साहिलंय
किती पाहिलंय आमच्यासाठी
चंदनापरी झिजवलंय
आयुष्य वाहिलंय आमच्यासाठी
सारं काही
आलबेल वाटत असताना
तुमच्या चष्म्याआडची
खंत अस्वस्थ करत आहे
दानवतेच्या जात्यात
मावतेच्या चिंध्या होताना
पापण्यांच्या कडा
ओलावल्याचे भासत आहे
आज तुमच्या प्रतिमेसमोर
उभं राहण्याचं धाडस होत नाही
कारण..
आम्ही आमच्या स्वार्थासाठी
समाजाचा बळी देऊन
खुर्चीचं हाडूक पटकवलंय
तुम्ही देशाला दिलेल्या
लोकशाहीला
आम्ही फासावरती लटकवलंय
बाबा....
आता जातीसाठी
माती खाणार्यां
माणसांच्या जमाती
एकमेकांचे
लचके तोडू पाहताहेत
स्वार्थाने बरबटलेल्या जंगलातील
दोन हातापायांची जनावरं
पिसाट होऊन वावरताहेत
तथागताची करुणा,शांतता
जोतिबांची समता
आणि तुमची
स्वातंत्र्य,न्याय बंधुता
विकून खाल्लीय कवडीमोलात
या मुठभर जातीच्या दलालांनी
आणि सत्तांध..
बाजारबुणग्या..भडव्यांनी
असो..
आमच्यातला मेलेला माणुस तुम्ही जागा केलात.
::::::::::::::::::::::::::
कवी किरण अहिवळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा